पुणे – भारती विद्यापीठाच्या ९३७ स्वयंसेवकांनी रक्तदानासाठी केलेल्या विक्रमी नोंदणीतून ५८६ जणांनी रक्तदान केले. रक्तचे नाते’ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राम बांगड यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राम बांगड यांनी रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे सांगून तरुणांना या उदात्त कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी रक्तदात्यांना ‘खरे हिरो’ संबोधत, गेल्या ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाच्या सातत्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण ९३७ स्वयंसेवकांनी नोंदणी केली असून, दिवसभरात ५८६ पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. याप्रसांगी भारती परिवाराचे अध्यक्ष बाबा शिंदे, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, एन.एस.एस. अधिकारी प्रा. प्रशांत यादव आणि विविध ब्लड बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. सुनीता जाधव यांनी प्रास्ताविक केले, डॉ. प्रिया हिरवे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. प्रशांत यादव यांनी आभार मानले.