Pune District : देवदत्त निकम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Pune District : देवदत्त निकम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून नुकसानाची माहिती दिली असल्याचे सांगितले.

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, पोंदेवाडी, काठापूर, पारगाव येथे झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी शनिवारी सकाळी केली. नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सदस्य श्वेता ढोबळे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, उद्योजक संजय बढेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वादळामुळे अनेक घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे, पोल्ट्री फार्मचे, पत्र्याच्या शेडचे तसेच फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले.
देवदत्त निकम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून नुकसानाची माहिती दिली असल्याचे सांगितले. शासनाकडे याबाबत पाठपुरावा करून बाधित शेतकरी व नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा : Koregaon News : बंद पडलेल्या शिवशाहीला ‘लालपरी’चाच आधार!





