Koregaon News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बससेवेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून, कोरेगाव शहरात गुरुवारी सायंकाळी ठाणे- वडूज शिवशाही बस भररस्त्यात बंद पडल्याने प्रवाशी संतप्त झाले. विशेष म्हणजे, सुरूच न होणाऱ्या या शिवशाही बसला अखेर एसटीच्या पारंपरिक ‘लालपरी’ बसने ओढत कार्यशाळेत नेल्याने शिवशाहीपेक्षा लालपरीच भरोसेमंद अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे एस. टी. महामंडळाचा गर्दीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित आणि वारंवार बिघाड होणाऱ्या शिवशाही बसेस रस्त्यावर चालविल्या जात असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सतत बंद पडणाऱ्या शिवशाही बसेस अखेर बंद करणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला. Pune District : अतिक्रमणावर कारवाई की पुन्हा तडजोड? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष गुरुवारी सायंकाळी ठाणे- वडूज मार्गावरील शिवशाही बस कोरेगाव शहरात दाखल झाली. आझाद चौकात प्रवासी उतरवल्यानंतर चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र, बसने प्रतिसादच दिला नाही. चालक आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास दीड तास विविध तांत्रिक प्रयत्न केले, तरी बस जागेवरून हलत नव्हती. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, अवघ्या पाचशे मीटर अंतरावर एस. टी. आगाराची कार्यशाळा असतानाही बस स्वतःच्या शक्तीने तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर कोरेगाव आगारातून रात्री सुटणारी शेवटची कोरेगाव- सिद्धार्थनगर लालपरी बस मदतीसाठी बोलावण्यात आली. त्यानंतर लालपरीने शिवशाही बसला ओढत कार्यशाळेकडे नेण्यास सुरुवात केली. आझाद चौक ते एसटी आगार या छोट्याशा अंतरावर जवळपास तासभर दोन्ही बसेसचा ‘पाठशिवणीचा खेळ’ सुरू होता. कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांसह दोन्ही बस चालकांनी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर शिवशाही बस आगारात दाखल केली. परिणामी, मदतीसाठी गेलेली कोरेगाव-सिद्धार्थनगर बसही उशिराने मार्गस्थ झाली आणि त्या मार्गावरील प्रवाशांनाही विलंबाचा फटका बसला. शिवशाहीत बसणं म्हणजे घोडचूक शिवशाही बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर जोरदार टीका केली. महाग तिकीट घेऊनही प्रवासात कोणतीही खात्री नाही. शिवशाहीत बसणं म्हणजे घोडचूक झाली, अशा शब्दांत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी “एसी बंद, बस बंद आणि प्रवासी त्रस्त” अशी प्रतिक्रिया देत एसटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Satara : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत दोभालकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा – डॉ. ज्ञानदेव म्हस्के