विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन चतुर्थांश जागा मिळतील

प्रकाश जावडेकर : पुण्यातील आठही जागा जादा मताधिक्याने जिंकू
पुणे – “संपूर्ण राज्यात भाजपला तीन चतुर्थांश जागा मिळतील. तसेच पुण्यातील आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या आठही जागा आम्ही पुन्हा एकदा अधिक मताधिक्याने जिंकू,’ असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बुथप्रमुखांचा मेळावा बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जावडेकर उपस्थित होते.
भाजप शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, हरिष परदेशी, जितेंद्र पोळेकर, संजय गावडे आदी उपस्थित होते. “गेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासाची गती वाढली आहे. योजना नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा चांगला परिणाम होत आहे,’ असा दावा जावडेकर यांनी केला.





