“देर आये दुरुस्त आये…”; मनोज जरांगेंच्या निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत

Chhagan Bhujbal on Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपले अर्ज मागे घ्यावे. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. नेहमीच जरांगेंविरोधात बोलणाऱ्या भुजबळ यांनी म्हंटले की, “मनोज जरांगे यांनी जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचं मी स्वागत करतो, या निर्णयानंतर देर आये दुरुस्त आये असं आपल्याला म्हणता येईल.”
मनोज जरांगे यांचा निर्णय योग्य
पुढे ते म्हणाले, “एकप्रकारे मनोज जरांगे यांचे म्हणणं योग्यच आहे. एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे बांधव मोकळेपणाने मतदान करतील. सर्व पक्षातून जे उमदेवार उभे आहेत, त्यापैकी ६० ते ७० टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय योग्य आहे,” असेही ते म्हणाले. Chhagan Bhujbal on Manoj Jarange |
मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, “आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. पण आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असे होत नाही.”
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबर रोजी रविवारी कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एका दिवसातच या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. Chhagan Bhujbal on Manoj Jarange |
हेही वाचा:





