ठाकरे-पवारांच्या प्रयत्नांना अखेर यश ! भूम परंड्यात बंडखोरी रोखली ; राहुल मोटेच परांड्यातील मविआचे अधिकृत उमेदवार

Bhum Paranda Vidhan Sabha । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे. त्याच आव्हानात दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश येताना दिसून येत आहे. कारण भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडूनही दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते . यात ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांचा समावेश होता. मात्र आज अखेर ही बंडखोरी रोखण्यात ठाकरे आणि पवारांना यश आले असल्याचे दिसत आहे. कारण आता ठाकरे गटाचे रणजित पाटील हे भूम परांडा मतदारसंघातून माघार घेणार आहेत.
उमेदवारी माघारी घेण्यात शरद पवारांचा हात Bhum Paranda Vidhan Sabha ।
ठाकरे गटाचे रणजित पाटील हे या विधानसभा मतदारसंघाकडून अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे आता शरद पवार गटाचे राहुल मोटे हे भूम परांडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. रणजित पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्यात शरद पवार यांचा महत्त्वाचा हात असल्याचे बोलले जात आहे.
रणजित पाटील यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतील वाद मिटल्याने भूम परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्यासमोरील आव्हान वाढू शकते. गेल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांना कडवी टक्कर दिली होती.
राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देणार ? Bhum Paranda Vidhan Sabha ।
ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भूम परांडा मतदारसंघातून रणजित पाटील यांना संधी देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचा मुलगा रणजित यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली होती. मात्र, भूम परांडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देऊ शकतात, ते जिंकून येण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. परंतु, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील चर्चेनंतर आता या मतदारसंघातून राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.





