‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आशा भोसले यांना प्रदान; प्रसाद ओकही ठरला सन्मानाचा मानकरी

मुंबई – मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले भावूक झालेल्या पाहायला मिळाले. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते.
या मानाच्या पुरस्काराचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. याच सोहळ्यात भारतीय संगीतातील योगदानासाठी पंकज उधास, अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम मराठी नाटकासाठीचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला देण्यात आला. तर समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, साहित्य क्षेत्रासाठी ग्रंथाली प्रकाशनाला वागविलासिनी पुरस्कार देण्यात आला. कला, संगीत, समाजसेवा, वैद्यकीय, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो.
मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या सोहळयाला शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व गायक हरिहरन यांच्या गाण्याची मैफील रंगली होती. सोबतच आसाम येथील नृत्य कलाकारांचे कथ्थक नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आले होते. दरम्यान, प्रसाक ओकने मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खास पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
त्याने लिहिलं की, “यावर्षीचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ मला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी आणि धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीमचे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पं.हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतश: ऋषी आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो”.




