Trump releases JFK assassination files | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. 60 वर्षांनंतरही त्यांची हत्या एक रहस्यच आहे. 22 नोव्हेंबर 1963 रोजी डॅलास येथे त्यांची हत्या झाली होती. ही घटना कागदपत्रांमध्ये बंद झाली असली तरीही याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आता या प्रकरणाची गोपनीय कागदपत्रे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जॉन एफ केनेडी यांना कोणी व का मारले? सीआयए आणि परदेशी गुप्तचर संस्थांनी त्याची हत्या केली का? जेएफकेच्या स्वतःच्या सरकारशी संबंधित लोकांनी त्यांच्याविरुद्ध कट रचला होता का? असे प्रश्न आजही विचारले जातात. मात्र, आता या राजकीय हत्येशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे आता मिळण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येशी संबंधित सर्व फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांनी वारंवार या घटनेशी संबंधित कागदपत्रं उघड करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी जेएफकेशी संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या एका पोस्टमध्ये कागदपत्रांशी संबंधित लिंक शेअर केली. त्यांनी हे पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पारदर्शकतेच्या नवीन युगाची सुरुवात केल्याचे प्रतीक असे वर्णन केले. तसेच, कोणतीही माहिती न लपवता सर्व फाइल्स जनतेसाठी सार्वजनिक केल्या जात असल्याचे सांगितले.
जॉन एफ. केनेडी हत्या प्रकरणातील जवळपास 80 हजार पानांचे दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले आहे. या कागदपत्रांमध्ये छायाचित्रे, मोशन पिक्चर्स, ऑडिओ रेकॉर्डिंग व इतर कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांमधून जेएफके यांच्या हत्येशी संबंधित महत्त्वाची माहिती सार्वजनिक झाली आहे.
दरम्यान, जॉन एफ केनेडी यांची हत्या ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय हत्येपैकी एक आहे. ट्रम्प यांनी वारंवार अशाप्रकारच्या हत्येशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करणार असल्याचे म्हटले होते. जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरही त्यांनी कागदपत्रं सार्वजनिक करण्यासंदर्भातच्या कार्यकारी आदेशावर सही केली होती.