CJP Protest Shivaji Park : शिवाजी पार्कवर सीजेपीच्या आंदोलनाला गर्दी; मिम्स आणि घोषणांची रंगत.!
आंदोलनाच्या ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भागात पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

CJP Protest Shivaji Park – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शुक्रवारी शिवाजी पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी हजारो लोक जमले. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी, राजकीय सभांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर घोषणांचे फलक आणि तिरंगा घेऊन तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आंदोलनाच्या ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भागात पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. ठाकरेसेना आणि मनसेने सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातही सुरक्षा दल तैनात केले होते.
परिसरातील काही रहिवाशांनी आपल्या भागात होत असलेल्या या आंदोलनाला विरोध दर्शविला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सीजेपीचे संयोजक अभिजीत दिपके यांनी दक्षिण मुंबईतील गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकता असावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांचे बॅरिकेड्स आणि कडक उन्हाचा अडथळा असूनही शुक्रवारी शिवाजी पार्कवरील आंदोलकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. सीजेपीच्या या आंदोलनासाठी तरुणांचे जत्थेच्या जत्थे तिथे जमले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी उपहासात्मक मिम्स आणि चित्रपटांमधील संवाद लिहिलेले फलक हाती घेतले होते.
ज्ञानू, तुझा लोकशाहीवर विश्वास नाही का?, ज्ञानेश भाऊ, राजीनामा द्या आणि गद्दार ज्ञानू मस्ट गो असे लिहिलेले पोस्टर्स आणि तिरंगा फडकवत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया सारख्या संघटनांचे कार्यकर्ते व तरुणांनी या परिसरात गर्दी केली होती. आंदोलकांनी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी काही वेगळ्याच गोष्टींचा वापर केला होता.





