मोठ्या सोसायट्या पुणे महापालिकेच्या रडारवर

प्रकल्प बंद असल्यास कचरा उचलणे बंद करणार
पुणे – दरारोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी आपल्याच परिसरात त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यासाठी उभारलेले प्रकल्प बंद असल्यास अथवा प्रकल्पच उभारलेला नसल्यास अशा सोसायट्यांचा कचरा1 एप्रिलपासून न उचलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, या सोसायट्यांना वारंवार नोटीस देण्यात आली असून आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. त्यातच, महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने दररोज तयार होणाऱ्या सुमारे 400 ते 500 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली आहे. हा कचरा जागा मिळेल तिथ महापालिका साठवित आहे. ही बाब लक्षात घेऊन कचरा प्रक्रियेवरील ताण कमी करण्यासाठी ज्या भागात कचरा निर्माण होईल, त्याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे.
शहरात अनेक मोठ्या सोसायट्या असून त्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक फ्लॅट आहेत, अशा ठिकाणी पालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक सोसायट्यांनी महापालिकेस दाखविण्या पुरते प्रकल्प उभारले असून काही ठिकाणने प्रकल्प बंद आहे. त्यामुळे महापालिकाच या सोसायट्यांचा कचरा उचलत आहे.
सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया होत नसल्याचे आढळल्यास 5 ते 15 हजार रुपयांचा दंड त्यांकडून आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.





