प्रभात वृत्तसेवा खालापूर – पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ रविवारी (दि. २७) सकाळी मोठी दरड कोसळून मंदिरातील दोन पूजाऱ्यांचे घर कोसळले. सुदैवाने या पूजाऱ्यांना वेळेवर धोक्याची जाणीव झाल्याने ते सुरक्षितरित्या बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोरघाटातही प्रचंड पावसामुळे जमीन खचली आणि शिंग्रोबा मंदिराच्या शेजारी असलेले पूजाऱ्यांचे घर अचानक दरडीत गाडले गेले. दरड कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच पूजाऱ्यांनी बाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे हे पूजारी सुदैवाने वाचले असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.शिंग्रोबा देवाचे मंदिर हे बोरघाटातील एक श्रद्धास्थान असून, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक येथे थांबून देवाचे दर्शन घेतात. मंदिरातील पूजाऱ्यांसाठी मंदिराच्या शेजारीच राहण्याची व्यवस्था होती. मात्र, आता हे घर दरड कोसळल्याने पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आणखी दरड कोसळू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवरील गावांमध्ये आणि घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि यात्रेकरूंना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.