पुणे | भूमिअभिलेख विभाग झाला टेक्नोसॅव्ही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य सरकारच्या भूमिअभिलेख विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत राज्यभरातील ३० हजार ५०० हून अधिक गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
त्यापैकी १८ हजार ९७७ गावठाणांचे नकाशे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत २१ लाख ६ हजार ४४ मिळकतदारांना मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी दिली.
पारंपरिक पद्धतीने गावठाणाची मोजणी करण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालवधी लागतो. १९६० पासून २०२० पर्यंत राज्यातील केवळ चार हजार गावांतील नागरिकांना आतापर्यंत प्रॉपर्टी कार्ड मिळाले होते. भूमिअभिलेख विभागाने ड्रोनच्या साह्याने गावठाणांची मोजणी करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला.
करोनाची दोन वर्षे सोडल्यानंतर आतापर्यंत या विभागाकडून ३० हजार ५८९ गावांच्या गावठाणाची मोजणीचा विक्रम केला आहे. त्यापैकी ३० हजार ९९ गावठाणांचे प्रारूप नकाशे व १८ हजार ९७७ गावठाणांचे अंतिम नकाशे तयार करण्यात आले आहेत, असेही गोळे यांनी सांगितले.
ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे
– ड्रोनद्वारे मोजणी केल्यास वेळेची सर्वाधिक बचत
– 15 ते 30 दिवसांचे काम एका दिवसात पूर्ण
– ड्रोनद्वारे मोजणीची अचूकता अधिक
– मोजणीच्या खर्चात 50 टक्के बचत
– प्रॉपर्टी कार्ड हे महसूलविषयक मालकी हक्काचा पुरावा
– प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाचे वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद
-सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार
-सदनिकेची खरेदी विक्रीवेळी उद्भवणारे वाद मिटणार
– बँकांकडून कर्ज मिळविणे आणखी सुलभ
– मिळकतकराच्या उत्पन्नवाढीस मदत



