Land Fraud – आगाखान पॅलेससमोरील कोट्यवधी किमतीच्या प्लॉटवर मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्री व गहाणखत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिल्ली येथील व्यावसायिक अभिनव कोतरू (५०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार येरवडा येथील आगाखान पॅलेससमोर, सुमारे ११ हजार ६०० चौरस फुटांचा प्लॉट आहे. हा प्लॉट दिवंगत ब्रिज किशन कोतरू यांनी १९७२ साली खरेदी केला होता. त्यांचे २१ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. न्यायालयीन आदेशानंतर २०२२ मध्ये कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळाले व २०२५ मध्ये नगर भूमापन कार्यालयात फेरफार नोंदही वारसांच्या नावावर झाली. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्लॉटवरील वॉचमनला काही व्यक्तींनी प्लॉट आम्ही खरेदी केला असल्याचे सांगून जागा रिकामी करण्यास सांगितल्याने प्रकार उघड झाला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने स्वतःला “एस.के. अँग्रो” कंपनीचा सीएमडी असल्याचे सांगत डिसेंबर २०२४ मध्ये ब्रीज किशन कोतरू यांच्याकडून प्लॉट खरेदी केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, ब्रीज किशन कोतरू यांचे निधन २०१२ मध्ये झालेले असताना ३ व ४ डिसेंबर २०२४ रोजी दुय्यम निबंधक, हवेली क्र. १९, औंध येथे ॲग्रीमेंट टू सेल, सेलडीड व गहाणखत नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अज्ञात तोतया व्यक्तीला “ब्रीज किशन कोतरू” म्हणून उभे करून, दोन साक्षीदारांच्या मदतीने आणि एस.के. अँग्रोफूड टेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीच्या सहभागाने हे बनावट दस्त तयार करण्यात आले. या व्यवहाराच्या आधारे बँक कर्ज प्रक्रियाही सुरू केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काही व्यक्तींनी ११ कोटी रुपयांत प्लॉट खरेदीचा व्यवहार झाल्याचा दावा करीत स्टॅम्प ड्युटीवर ७० -८० लाख रुपये भरल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली. वारसांच्या म्हणण्यानुसार, कोटींच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी संगनमताने फसवणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, बनावट कागदपत्रे तयार करणारे, साक्षीदार व संबंधित कंपनी प्रतिनिधी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून नोंदवलेले दस्त, सीसीटीव्ही फुटेज, निबंधक कार्यालयातील नोंदी व बँक व्यवहारांची छाननी केली जात आहे.