Lalu Prasad Yadav : राजदच्या अध्यक्षपदासाठी लालूंनी दाखल केला अर्ज

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लालूंनी पाटण्यातील वीरचंद पटेल पथ येथील पक्षाच्या केंद्रीय कॅम्प ऑफिसमध्ये राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. रामचंद्र पूर्वे आणि सहाय्यक राष्ट्रीय निवडणूक अधिकारी चित्तरंजन गगन यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री आणि लालूंच्या पत्नी राबडी देवी, मुलगा आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, लोकसभा खासदार आणि कन्या मीसा भारती, राजदचे बिहारचे अध्यक्ष मंगनीलाल मंडल, अब्दुलबारी सिद्दीकी इत्यादी उपस्थित होते. लालूंची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते आहे. या पदासाठी दुसरा कोणीही दावेदार नसल्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार फक्त निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करायची आहे. पक्षाच्या संघटनात्मक अधिवेशनासाठी राष्ट्रीय जनता दलाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या टप्प्यात, राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रामुख्याने होणार आहे. यासाठी लालूंनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत राष्ट्रीय सहाय्यक निवडणूक अधिकारी चित्तरंजन गगन हे नामांकन पत्रांची तपासणी करतील. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जातील. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. रामचंद्र पूर्वे आणि राष्ट्रीय सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली होणार आहे. कॅम्प ऑफिस पक्षाच्या राज्य कार्यालयाच्या परिसरात आहे.





