दिवाळी पर्यटनासाठी “लालपरी’ सज्ज; दररोज सुटणार 1000 जादा गाड्या

मुंबई – राज्यात करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. त्यातच आता दिवाळीचा सण आणि सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी “लालपरी’ अर्थात एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
राज्यातील सर्व पर्यटन स्थळे लॉकडाउननंतर खुली करण्यात आली असून पर्यटनासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे 1 हजार जादा फे-यांचे नियोजन केले आहे.
29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात. तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात.
गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज 1000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा. सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे आदेश परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी करोनाविषयक नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.





