कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; “लालपरी’ पुन्हा धावणार

मुंबई – हायकोर्टाच्या निर्देशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण रुजू झाले आहेत. यामुळे काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा लवकरच पुर्ववत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात लालपरी पुन्हा धावणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पाच महिन्यांपासून संप पुकरला होता. तसेच संपक-यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे निर्देश दिले. यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर परण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते.
सध्या कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 11 एप्रिलपर्यंत 44 हजार 435वर पोहचली आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली असल्याचे म्हटले जात आहे. येत्या काही दिवसांत कामावर परतणाऱ्यांची संख्या 50 हजार होण्याचा अंदाज आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटीमध्ये सध्या 29303 चालक आणि 24670 वाहक आहेत. त्यातील अनेकजण पुन्हा कामावर रुजू होत आहेत. यामुळे अनेक मार्गावरील एसटी सेवा पूर्ववत होणार आहेत.





