Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब; अभिनेत्री आरती सोळंकीची पोस्ट चर्चेत

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : मुंबईसह राज्यभरात ११ दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. शनिवारी सकाळी विसर्जन मिरवणूक निघाली, पण यंदा मिरवणूक खूपच लांबली. तब्बल ३३ तासांनंतर, ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता राजाचं विसर्जन पार पडलं.
लालबागच्या राजाचं विसर्जन हे नेहमीच चर्चेचं ठरतं. हजारोंच्या संख्येने भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पण यंदा विसर्जन ठरलेल्या वेळेत न झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.
गिरगाव चौपाटीवर राजाचं आगमन झाल्यानंतर लगेच विसर्जन होईल असं अपेक्षित होतं. पण समुद्रात मोठी भरती होती आणि मूर्ती चढवण्यासाठी तयार केलेल्या आधुनिक तराफ्यावर तांत्रिक अडचणी आल्या. हा तराफा गुजरातमध्ये खास तयार करण्यात आला होता. तो स्वयंचलित असून समुद्रात स्वतः पुढे जातो. मात्र, मूर्ती चढवताना तो नीट काम न केल्यामुळे विसर्जनाला उशीर झाला. गिरगावचे पारंपरिक नाखवा हिरालाल वाडकर यांनीही हीच अडचण असल्याचं सांगितलं.
या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने लिहिलं –
“बहुतेक गुजरातवरून आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा… राजाला आपल्या कोळी बांधवांचीच सवय आहे ना… काय करणार.”
दरम्यान, दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर भाविकांच्या साक्षीने राजाचं विसर्जन पूर्ण झालं. आरती सोळंकी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने बिग बॉस मराठीतही सहभाग घेतला होता. ती नेहमीच सोशल मीडियावर सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील विषयांवर आपली भूमिका मांडताना दिसते.

