लक्षवेधी : मिथुनदांचा सन्मान

– मुकुंद फडके
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा.
देशामध्ये जे विविध पुरस्कार जाहीर केले जातात त्यापैकी चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च सन्मान म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देऊन मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांची आजवरची चित्रपट कारकीर्द जरी अधोरेखित करण्यात आली असली, तरी दरवर्षीप्रमाणे यावरूनही वादविवाद होऊ शकतो. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आशा पारेख आणि वहिदा रहमान या सुवर्ण काळातील ज्येष्ठ अभिनेत्रींचा सन्मान करण्यात आल्यानंतर एकदम केंद्र सरकारची नजर मिथुन चक्रवर्ती या त्या मानाने आधुनिक काळातील अभिनेत्याकडे वळल्यामुळे हा वाद होणे साहजिक आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचे भारतीय चित्रपट सृष्टीमधील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे. पण इतक्या लवकर त्यांना हा सन्मान देणे गरजेचे होते का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यांच्या आधीपासून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या आणि आजही नावारूपाला असलेल्या अनेक कलाकारांना डावलून मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान केला जात आहे की काय अशी एक शंका यानिमित्ताने विचारली जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आधी कित्येक वर्ष कार्यरत असलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा मालिनी किंवा असे अनेक कलाकार रांगेत असताना एकदमच मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार दिला आहे. अर्थात, भारतातील कोणताही सरकारी पुरस्कार जेव्हा जाहीर केला जातो तेव्हा अनेक वेळा पुरस्कार घोषणेनंतर काही जणांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होतच असते.
तशाच प्रकारची भावना यावेळी जरी व्यक्त होत असली, तरी भारतीय चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्ती यांचे योगदान नाकारूनही चालणार नाही. आपल्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक वेळा फिल्म फेअर आणि इतर पुरस्कार मिळवलेल्या मिथुन यांच्या कामगिरीची नोंद निश्चितच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ठळकपणे झाली आहे. ज्या कालावधीमध्ये अमिताभ बच्चन यांचे युग तयार झाले होते त्याच कालावधीमध्ये ‘गरिबांचा अमिताभ’ हा किताब मिळवून मिथुन चक्रवर्ती यांनी आपली वेगळी जागा निर्माण केली होती.
सध्याच्या कालावधीमध्ये नेहमीच एखाद्या चित्रपटाने केलेला व्यवसाय 500 कोटी आणि हजार कोटी या आकड्यात जरी मोजला जात असला, तरी मिथुन यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने त्या कालावधीमध्ये 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. शंभर कोटी रुपयांचे लक्ष्य पार केलेला हा इतिहासातील पहिला चित्रपट होता, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. अनेक समकालीन नायक आणि स्टार्स यांची तगडी स्पर्धा असतानासुद्धा स्वतःचा वेगळा फॅन बेस तयार करण्याचे काम मिथुन यांनी केले होते आणि तो फॅन बेस आजही कायम आहे.
1980च्या दशकात ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर इतर कोणत्याही समकालीन नायकांपेक्षा ते सर्वात लोकप्रिय ठरले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्याकडे निर्मात्यांची एवढी लाइन लागली होती की, त्यानंतरच्या कालावधीमध्ये एका वर्षात सर्वात जास्त चित्रपट प्रदर्शित होणारा तो एकमेव कलाकार होता. याची नोंद विक्रम पुस्तकात झाली होती.
एकीकडे अमिताभ बच्चन आणि तत्सम नायकांच्या निमित्ताने चित्रपट निर्मितीचा खर्च प्रचंड वाढला असताना कमी बजेटच्या चित्रपटांची निर्मिती करून तुलनात्मक गरीब निर्मात्यांना व्यावसायिकदृष्ट्या जिवंत ठेवण्याचे काम मिथुन यांच्या चित्रपटांनी निश्चितपणे केले होते. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीच्या कालावधीमध्ये एकीकडे धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र असे अनेक स्टारही बाजूला पडत असताना मिथुन यांनी मात्र आपले स्वतःचे वेगळे स्थान कायम ठेवले होते. खरे तर कारकिर्दीच्या अगदी प्रारंभी ‘मृगया’ या चित्रपटासाठी नॅशनल चित्रपट पुरस्कार मिळालेल्या मिथुन यांची चित्रपट कारकीर्द समांतर पद्धतीने चालेल आणि प्रायोगिक चित्रपटात ते जागा निर्माण करतील असे वाटत असतानाच व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांनी मिळवलेले यश निश्चितच लक्षणीय होते.
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ‘डिस्को डान्स’ची लोकप्रियता वाढवण्यामध्ये त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. आजही त्या काळातील गाणी लोकप्रिय आहेत.नायक म्हणून कारकीर्द संपल्यावर मिथुन यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कधी छोट्या पडद्यावर परीक्षकाची भूमिका निभावली, तर मोठ्या पडद्यावर खलनायकी भूमिका निभावून किंवा कॉमेडी करून आपली अभिनय कारकीर्द चर्चेत ठेवली. चित्रपटाप्रमाणे राजकारणामध्येसुद्धा ते यशस्वी झाले आहेत. सध्या भारतीय जनता पक्षातर्फे ते सक्रिय राजकारणात आहेत. म्हणूनच कदाचित त्यांना हा सर्वोच्च सन्मान दिला गेला असावा, अशी शंकाही उपस्थित होत आहे. तरी या शंकांमुळे आणि वादविवादामुळे मिथुन चक्रवर्ती यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान कमी होणार नाही.
1969 पासून भारतीय चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणार्या विविध व्यक्तींचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन जो सन्मान करण्यात येतो त्याची सुरुवात देविका राणी यांच्यापासून झाली होती आणि आताचा पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंतची ही यादी पाहता भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधतेचे दर्शन त्यामध्ये घडताना दिसते. पण दरवेळी या पुरस्काराची घोषणा झाली की पुरस्कार विजेत्यापेक्षा इतर कितीतरी चांगले कलाकार उपलब्ध होते, अशा प्रकारचा वाद निर्माण होतोच. हे मात्र अपरिहार्य मानावे लागेल तसेच यावेळी झाले आहे. आतापर्यंत रसिकांच्या लोकमान्यतेवर विराजमान असणार्या मिथुन चक्रवर्ती यांना या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’मुळे खर्या अर्थाने राजमान्यता मिळाली हेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन.





