लक्ष्मी रस्ता अजूनही सुनासुना

कापड व्यापाराचा ‘रंग उडाला’
पुणे – शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान याबरोबरच पुणे व्यापारी हब म्हणूनही उदयाला आले आहे. पुण्यात जन्माला आलेली ड्रेस किंवा अन्य फॅशन ही नंतर अन्य शहरांमध्ये पसरते, असे म्हणतात. परंतु, करोनाची लागण माणसांबरोबरच आता या फॅशन इंडस्ट्रीला म्हणजेच पर्यायाने कापड व्यापारालाही झाली आहे. वेगवेगळ्या सण समारंभांनिमित्त कायमच गजबजलेला लक्ष्मी रस्ता पहिल्यांदाच लॉकडाऊनमुळे तीन महिने मनुष्यविरहीत पहायला मिळाला.
लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी लक्ष्मी रस्त्यावरील ते गजबजलेपण अद्यापही आले नसून, त्या रस्त्याची पूर्वीची झळाळी कधी येईल याची वाट तेथील व्यापारी पाहात आहेत. कापड, ड्रेस खरेदी ही पूर्वी सण समारंभानिमित्त केली जात होती. मात्र, गेल्या दीड दशकात तो ट्रेण्ड बदलून फॅशन बदलेल तशी खरेदी, शौक, बदललेले उच्च राहणीमान या सगळ्यामुळे कापडव्यापार 12 महिने तेजीत आला. मात्र, करोनामुळे या व्यापारालाच करोना झाला असून, अनेक दुकानदारांना त्यांचा व्यापार कायमस्वरुपी “लॉकडाऊन’ करायची वेळ आली. याविषयी काही व्यापाऱ्यांनी “दैनिक प्रभात’कडे याविषयीची खंत व्यक्त केली.
तरुण-तरुणींची गर्दी जास्त असते. परंतु, आता कॉलेजेस, क्लासेस बंद असल्याने युवक-युवती खरेदीलाच येत नाहीत. बहुतांश विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे आणि त्यांच्या खिशातच सध्या पैसे नसल्याने या गोष्टींची खरेदी ते सध्या करत नाहीत. त्यामुळे अजिबातच व्यवसाय होत नाही. आमच्याकडे आम्ही कधीच सेल लावत नव्हतो परंतु यावर्षी तो लावला आहे.
– भरतभाई पाध्याय, ट्रेण्ड कॅज्युअल्स अँड फॉर्मल्स
मार्च ते मे हा लग्नसराईचा काळ असतो. त्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत ती खरेदी असते. परंतु, हा सीझनच पूर्ण गेल्याने व्यापारावर परिणाम झाला. लॉकडाऊन शिथिल झाले तर आता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहक कमी होतातच परंतु आता मुळात खरेदी करायला कोणी येतही नाही. याशिवाय आता सेलचा सीझनही सुरू होत आहे. त्यालाही आता प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने “पी 1, पी 2′ सुरू केले आहे. त्यामुळे साप्ताहिक सुटी वगळता केवळ 12 दिवसच दुकान सुरू ठेवावे लागते. या 12 दिवसांत व्यवसाय किती होणार?.
– एकनाथ कुऱ्हाडे, व्यापारी, लक्ष्मी रस्ता
आमचे स्वत:च्या मालकीचे दुकान आहे. त्यामुळे भाडे भरण्याचा प्रश्न नाही, परंतु वीजबील, कामगारांचे पगार, मेन्टेनन्स या सगळ्याचा विचार करावा लागतो. सद्य:स्थितीत खरेदीला लोकच येत नसल्याने हा खर्च निघत नाही. ज्यांची दुकाने भाड्याने आहेत त्यांना लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे आहे. मालासाठी बॅंकांचे कर्ज घेतलेले असते. त्याचा हप्ता, व्याज जाते. त्यामुळे हा सगळा खर्च निघत नाही.
– विजय कुंदन, कुंदन वुलन्स, लक्ष्मी रस्ता दुकानदार
गेल्या अनेक वर्षांपासून आमचे दुकान आहे. आम्ही अनेक वर्षांत बांधलेले ग्राहक आहेत. “पी1-पी2’मुळे ग्राहकांना समजतच नाही की दुकान कोणत्या दिवशी सुरू आहे. त्यांचा हेलपाटा होतो आणि दोन दोन दिवस कोणी बाहेर पडत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये असा प्रकार ठेवला नाही, तेथे सगळे दिवस दुकान सुरू ठेवता येते, मग लक्ष्मी रस्त्यावरच हा निर्बंध का? उत्पादकांकडे माल आहे परंतु त्याला उठाव नाही. नागरिकही सध्या त्यांना हवे तेवढेच खरेदी करत आहेत. उगाच जास्तीची खरेदी केली जात नाही. सण समारंभात सहभागी होत नसल्याने ती खरेदीही होत नाही. दुकान उघडून कोणतेच “बेनिफिट’ होत नाही, उलट दुकान उघडल्यावर खर्च सुरू होतो. ज्यांचे भाड्याने दुकान आहे, त्यांचे मालक भाड्यामध्ये सूट देत नाहीत किंवा मुदतही दिली जात नाही. त्यामुळे अनेकांनी दुकान सोडणेच पसंत केले आहे. भाड्याचे देण्याचे जे पैसे वाचले तेच “प्रॉफिट’ आहे असे समजून ते शांत बसले आहेत. परंतु, मानसिक परिस्थिती वाईट होत आहे. उत्पादकांना पैसे मिळत नाही. जानेवारीमध्ये उचललेल्या मालाचे पैसे दुकानदार अजूनही देऊ शकला नाही. कारण, त्याचीच विक्री झाली नाही. अशी सगळी अवघड परिस्थिती झाली आहे.
– किरण गाला, छेडा ब्रदर्स, लक्ष्मी रस्ता व्यावसायिक





