पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत लक्ष्मी पावली!

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून दिवाळीअधीच विशेष ट्रेनचे नियोजन केल्यामुळे रेल्वे प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. पर्यायाने यंदाच्या दिवाळीत प्रवासी संख्याही गतवर्षीच्या तुलनेत एक लाखाने वाढली. तर, पुणे रेल्वे विभागाला अवघ्या तीन आठवड्यांत 61 कोटी 64 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मध्य रेल्वेतील पुणे रेल्वे हा एक महत्त्वाचा विभाग आहे. पुण्यातून दिवासाला 120 पेक्षा जास्त ट्रेन धावतात. त्तसेच, रेल्वेकडून काही साप्ताहिक ट्रेन चालविल्या जातात. यंदा दिवाळीच्या काळात लांब पल्ल्याच्या ट्रेन्सला खूपच वेटिंग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर, दानापूर, गोरखपूर व इतर काही शहरांसाठी विशेष ट्रेन चालवल्या होत्या. तरीही दिवाळीच्या काळात सर्व ट्रेन फुल्ल होत्या. दिवाळी व छठ पूजामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना जास्त मागणी होती.
रेल्वे प्रशासनाने दि. 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान 22 विशेष रेल्वे गाड्यांच्या 260 फेऱ्या केल्या. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेला तिकीट विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. पुणे रेल्वे विभागातून नोव्हेंबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये 29 लाख 68 हजार प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. त्यामधून रेल्वेला तब्बल 61 कोटी 64 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. दरम्यान, यंदा पुण्यातून दिवाळीच्या काळात दिवासाला साधारण दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
दिवाळीमध्ये रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आणि रेल्वेला उत्पन्न देखील चांगले मिळाले आहे. – डॉ. रामदास भिसे, वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी





