भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार पहिल्यांदाच बंद

करोनाचा लाखोंच्या उलाढालीला फटका
पुणे – यंदा करोना पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बकऱ्यांचा बाजारांपैकी एक आणि लाखोंच्या घरात आर्थिक उलाढाल होणारा लक्ष्मी बाजार सुमारे 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ईदच्या दिवशी बंद राहणार आहे. नागरिकांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यंदा बकरी ईद साजरा करण्याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात बोकड खरेदी-विक्री बाजार भरविण्याबाबत निर्बंध आहे. भवानीपेठेतील लक्ष्मी बाजार आवारात पुणे शहर हिंदू खाटीक समाज विश्वस्त मंडळाकडून पत्रे लावली असून, परिसरामध्ये कोणीही खरेदी-विक्री करू नये. या सूचनेचा फलक लावला आहे. असे करताना आढळल्यास कारवाई करणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. मात्र, बाजार बंद असल्याने काही विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला विक्री सुरू केली आहे.
प्रत्येकाला ऑनलाइन खरेदी-विक्री शक्य नसल्याने या परिसरात खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र आहे. पुणे शहर हिंदू खाटीक समाज ही संस्था सन 1917 पासून कार्यरत आहे. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आम्ही सरकारला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे पुणे शहर हिंदू खाटीक समाज विश्वस्त मंडळाचे मनिष घोणे यांनी सांगितले.





