लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा
आळंदी – आज पंढरीच्या पांडुरंगाची प्रबोधिनी कार्तिकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात शुक्रवारी (दि. 4) पहाटेपासूनच राज्यभरातील भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी तब्बल तीन वर्षानंतर पूर्ण निर्बंधयुक्त क्षमतेने भरणार असून, यावेळी आठ ते दहा लाख भाविक कार्तिकी वारी साठी अलंकापुरी नगरीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने देवस्थान आजपासूनच भाविकांच्या सोयी सुविधांसाठी कामाला लागले असल्याची माहिती देवस्थानकडून मिळाली आहे.
शुक्रवारी पहाटे माऊलींना पवमान अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमासह आजची एकादशी भाविकांना संपूर्ण दिवसभर मंदिर खुले करून यावेळी लाखो भाविकांनी माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले.
प्रथा परंपरेप्रमाणे सायंकाळी ठीक साडेपाच वाजता माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली. यावेळी आळंदी परिसरात माऊली माऊलीचा एकच नामघोष होत होता. तसेच हरिनामाच्या गजरात पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडली. दरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीकरांसह राज्यातील भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.





