ओझरच्या विघ्नहर मंदिरात संकष्टी चतुर्थीला लाखो भाविकांची मांदियाळी

ओझर – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात, ओझर येथे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी गणरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ५ वाजता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, विश्वस्त विलास कवडे, संतोष कवडे, विनायक मांडे आणि शिल्पा जगदाळे यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक आणि पूजा संपन्न झाली.
मंदिरात महाआरतीचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सचिन घुले, जगन कवडे, सुशांत शिंदे, डॉ. सचिन शिंदे आणि प्रतीक गायकर यांना आरतीचा मान मिळाला. सकाळी ७:३० आणि दुपारी १२:०० वाजता मध्यान्ह आरती, तर सकाळी ८:०० वाजता नियमित पोथी वाचन झाले. सकाळी १०:३० वाजता श्रींना नैवेद्य दाखवून भाविकांना ट्रस्टतर्फे खिचडी वाटप करण्यात आले. विघ्नहराला फुलांची आरास, रेशमी जरीचा पोशाख आणि सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले, ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य खुलले.
सुविधांनी युक्त व्यवस्था
भाविकांसाठी मंदिर परिसरात दर्शनरांग, थंड पाण्याची व्यवस्था, कुलर, अभिषेकासाठी शमी वृक्षाखाली विशेष व्यवस्था, देणगी कक्ष, विघ्नहर उद्यान, चप्पल स्टँड, पार्किंग आणि मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध होती. सायंकाळी ७:०० वाजता हरिपाठ, तर चंद्रोदयापर्यंत ह.भ.प. अशोक महाराज शेळके यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना राम प्रसादिक भजनी मंडळ, शिरोली यांनी साथ दिली. रंगनाथ रवळे यांनी चतुर्थीच्या निमित्ताने अन्नदान केले. रात्री १०:३० वाजता शेजआरतीनंतर ११:०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.
ट्रस्टला दानशूर व्यक्तींची साथ
महाआरतीच्या मानकऱ्यांनी तसेच दानशूर व्यक्ती प्रमीला ढोले आणि डॉ. सचिन शिंदे यांनी ट्रस्टला देणगी दिली. देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी गर्दीचे उत्तम नियोजन केले, ज्यामुळे भाविकांना कोणताही त्रास झाला नाही.





