अंगारक चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन

ओझर: अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात आज मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट २०२५) अंगारक चतुर्थी निमित्ताने लाखो भाविकांनी श्री गणपतीचे दर्शन घेतले. पहाटे ४ वाजता मंदिराचे दार उघडण्यात आले आणि भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे यांच्यासह विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, प्रकाश मांडे, समीर मांडे, विनायक जाधव, गोविंद कवडे, विलास कवडे आणि शिल्पा जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा संपन्न झाली. यावेळी ट्रस्टतर्फे गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीचा मान ज्योती मेटे, शेखर कानडे, अनिल पठारे, शीतल कदम, विनायक जठार, हेमंत जुईकर, रमेश जाधव, स्वप्नील पवार, जयेश घाडगे, लक्ष्मण विधाटे, प्रतिभा पाटील आणि अभिजित काजळे यांना मिळाला. या सर्वांचे आभार ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी मानले.
पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात फुलांची आरास आणि श्री विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले होते. सकाळी ७ आणि दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती झाली, तर सकाळी ८ वाजता नियमित पोथी वाचन झाले. सकाळी १०:३० वाजता श्रींना नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले.
भाविकांसाठी दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, शमी वृक्षाखाली अभिषेकाची सोय, विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान, चप्पल स्टँड, पार्किंग आणि मुखदर्शन व्यवस्था यासारख्या सुविधा ट्रस्टने उपलब्ध करून दिल्या. सायंकाळी ७ वाजता नियमित हरिपाठ, तर चंद्रोदयापर्यंत ह.भ.प. ओंकार महाराज मनसुख खिल्लारवाडी यांचे हरिकीर्तन. त्यांना राम प्रसादिक भजनी मंडळ, शिरोली यांची साथसंगत. रात्री १०:३० वाजता शेजारतीनंतर ११ वाजता मंदिर बंद.
आजच्या अंगारक चतुर्थीला लंबोदर भालचंद्र रवळे यांनी अन्नदान केले. तसेच, ज्योती मेटे, शेखर कानडे, अनिल पठारे, विजय सातव आणि प्रचीती धुरी यांनी ट्रस्टला देणगी दिली. उद्योजक सुरेंद्र वाधवा, हेमंत राजमाने आणि महेश गोरडे यांनीही श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. भाविकांचे स्वागत आणि गर्दीचे नियोजन ट्रस्टचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी यशस्वीपणे केले.





