Lakhimpur Kheri Case : आशिष मिश्राच्या अंतरीम जामीनात वाढ

नवी दिल्ली :- उत्तरप्रदेशात लखीमपुर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्यात आल्याच्या प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याच्या अंतरीम जामीनात सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आहे. आशिष मिश्रा यांना तुरुंगातून सुटल्यानंतर एका आठवड्यात उत्तर प्रदेश सोडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
3 ऑक्टोबर 2021 रोजी, लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत असताना तेथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला होता. तेथील हिंसाचारात एकूण आठ जण ठार झाले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, आशिष मिश्रा यांच्या वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केले. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी एसयूव्हीचा चालक आणि भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला.
जामीनावर असतानाच्या काळात साक्षीदारांना धमकावणे किंवा पुरावे नष्ट केल्याचा प्रकार केल्यास आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला जाऊ शकतो असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.





