मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojna) वेबसाईटमध्ये मोठे बदल करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेषतः पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी हे बदल केले जात आहेत, जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर होतील. ई-केवायसीच्या अडचणींवर तटकरेंचे स्पष्टीकरण – योजनेचा १६वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यापूर्वी त्यांना ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सर्वर डाऊन होणे, ओटीपी न येणे अशा अनेक समस्यांमुळे महिलांना ई-केवायसी करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर स्पष्टीकरण देताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत असल्यामुळे ई-केवायसीला वेळ लागत आहे. ज्या महिलेचा पती नाही किंवा वडील नाहीत, अशा महिलांसाठी वेबसाईटवर विशेष बदल केले जाणार आहेत.” ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणतीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. योजनेची पात्रता आणि हप्त्याबद्दल माहिती – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी पुढील हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती, मात्र ई-केवायसीच्या अडचणींमुळे विलंब झाला आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत – १६वा हप्ता जमा होण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी शिवाय पुढील हप्ता खात्यावर जमा होणार नाही. महिलांना ई-केवायसी करण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.