‘लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार’, काँग्रेसच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. कधी या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्याने, तर कधी या योजनेतील रक्कमेतील वाढ करण्यामुळे सातत्याने या योजनेची चर्चा होत आहे. यातच आता काँग्रेसच्या खासदाराने ही योजना लवकरच बंद केली जाणार असल्याचा दावा केला आहे. ही योजना बंद करण्यात येणार असल्याच्या दाव्याने महिलांना मोठा धक्का बसला आहे.
राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले आहे. तसेच, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील देण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत जवळपास अडीच कोटी महिलांना दरमहिन्याला 1500 रुपये दिले जातात. याशिवाय, लवकरच ही रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच, 50 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कल्याण काळे म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या चौकशीबाबत 9 लाखांचा आकडा समोर आला आहे. माझ्यापर्यंत 18 लाखांचा आकडा आला आहे. मात्र, आता हा आकडा 50 लाखांपर्यंत जाणार आहे. एकच सांगतो की हळूहळू ही योजना बंद होणार आहे, असा दावा त्यांनी केला.
लाडकी बहिण योजना मते खरेदी करण्यापुरती होते. तुम्हाला खात्री देतो की ही योजना बंद होणार आहे. हळूहळू या सरकारचे नाव युती सरकारऐवजी चौकशी सरकार असे नाव ठेवले तर योग्य होईल, असेही ते म्हणाले. महायुतीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.





