Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’ला 2100 रुपये कधी मिळणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं, ‘या’ दिवशी रक्कम वाढून….

Ladki Bahin Yojana | Sudhir Mungantiwar – आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.
आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस पात्र ठरल्या आहेत.
पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत.
दरम्यान, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून दोन हजार 100 रूपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने या योजनेचा हप्ता 2100 रूपये होणार का? अशीही चर्चा आहे. आणि हे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे.
मात्र, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतंय की या योजनेंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो.
मुनगंटीवार यांनी नुकतीच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, या योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांना महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण कराल का? असावं विचारण्यात आलं.
त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, ‘आम्ही 100 टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल.
मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला 2100 रुपये देण्याची क्षमता आहे.
मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.





