लाडकी बहीण योजनेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! अर्ज न करताही भावांच्या खात्यात 3 हजार जमा

यवतमाळ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने या योजनेसाठी अर्जही केला नव्हता किंवा तसे कोणते कागदपत्रेही दाखल केली नव्हती. पण त्यानंतरही त्याला 3 हजार रुपयांचा धनलाभ झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जाफर गफ्फार असे या तरुणाचे नाव आहे. जाफरने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला नव्हता किंवा त्यासाठी त्याने कुठे दस्तऐवजही सादर केले नव्हते. पण त्यानंतरही 3 हजार रुपयांची रक्कम त्याच्या अकाउंटवर जमा झाली आहे. जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज सादर न करता त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर या योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले आहेत. खात्यात जमा झालेली ही रक्कम पाहून तो पुरता चक्रावून गेला आहे.
काय म्हणाला जाफर शेख?
जाफर शेख या प्रकरणी म्हणाला की, लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये सध्या महिलांच्या बँक खात्यांत जमा होत आहेत. तसा एक मेसेज माझ्याही मोबाइलवर आला. त्यात माझ्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात 3 हजार जमा झाल्याचे नमूद होते. हे खाते मी 2012 मध्ये उघडले होते. पण ही बँक गावापासून दूर असल्यामुळे मी त्यावर कोणताही व्यवहार करत नाही.
त्यामुळे मोबाइलवरील मेसेज पाहून मी त्या बँकेत जाऊन शहानिशा केली. त्यावर खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाल्याचे मला समजले. विशेष म्हणजे मी या योजनेसाठी कोणताही अर्ज केला नाही. कुठेही कागदपत्रेही दिली नाहीत. त्यानंतरही हे पैसे माझ्या खात्यावर जमा झाले. असे का घडले याची चौकशी करावी, अशी मागणी जाफर शेखने केली आहे.





