कोल्हापूर : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. मात्र, यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरुष लाभार्थींची संख्या किती, याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे उपलब्ध नाही. या योजनेचे (Ladki Bahin Yojana) पोर्टल थेट मंत्रालयातून चालवले जाते आणि जिल्हा पातळीवर कोणतीही आकडेवारी पाठवली जात नाही. त्यामुळे पुरुष लाभार्थी, बोगस अर्जदार, सरकारी कर्मचारी महिला किंवा अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांबाबतची कोणतीही माहिती जिल्हा कार्यालयाकडे नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, 14,298 पुरुषांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे. यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आकडेवारीची पडताळणी करण्याचे आश्वासन दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरुष लाभार्थींची संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे ही माहिती नाही. जिल्ह्यांना माहिती का नाही? लाडकी बहीण योजनेची सर्व कार्यवाही मंत्रालयातूनच होते. लाभार्थी सरकारी कर्मचारी आहे का? अन्य योजनांचा लाभ घेत आहे का? बोगस अर्ज आहे का? तसेच चारचाकी किंवा उत्पन्नाच्या निकषात बसते का? याची तपासणी मंत्रालय स्तरावरच केली जाते. अनुचित लाभार्थी आढळल्यास त्यांचा लाभ बंद केला जातो. मात्र, ही माहिती जिल्हा कार्यालयांना दिली जात नाही. स्थानिक पातळीवर माहिती का उपलब्ध नाही, याचे उत्तर सरकारी यंत्रणेकडे नाही. तक्रारींतूनच माहिती लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्यावरच महिलांना याची माहिती मिळते, तेव्हा त्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात तक्रार घेऊन येतात. त्यानंतरच विभागाला लाभ बंद झाल्याचे कळते. अर्ज, आधार आणि इतर कागदपत्रे तपासून महिलांना कारण सांगितले जाते. कार्यालयात अशा तक्रारींची चार ते पाच रजिस्टर भरली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.