Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! लाभ घेण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

Ladki Bahin Yojana : महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. याबाबत राज्य सरकारीने नुकतीच अधिसुचना जारी केली आहे.
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ सतत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी आता ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली. दरम्यान, या योजनेंतर्गत २१-६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते.
अदिती तटकरे म्हणाल्या, ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या या नवीन निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीत आधार प्रमाणीकरण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.





