Laal Singh Chaddha : कृपया चित्रपटावर बहिष्कार टाकू नका – अमिर खान

मुंबई – अभिनेता आमिर खानचा लालसिंह चढ्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावरून जोरकसपणे सुरू आहे. आमिरने केवळ या चित्रपटात कामच केलेले नाही, तर तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिंगच्या पार्श्वभूमीवर आमिरने चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, तर तो पाहा असे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.
जो प्रकार सुरू आहे त्यामुळे आपण दु:खी आहोत. मला भारत आवडत नाही असे या लोकांना वाटते आहे. ते तसे म्हणत आहेत. मात्र हे पूर्णत: चुकीचे आहे. माझ्या चित्रपटाला एक चांगली संधी दिली जावी असे आवाहनही त्याने केले आहे.
आमिरचा एक 2015 च्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बहिष्काराचा हा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतातील वाढत्या असहिष्णुतेमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असून आपण कुठल्या अन्य देशात जावे, असे आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने त्याला म्हटल्याचे आमिर यात सांगताना दिसतो आहे. त्याच्या या मुलाखतीचे त्यावेळीही संतप्त पडसाद उमटले होते व आताही तोच व्हिडिओ पुन्हा जोरात चालवला जातो आहे.
आमिरचा लालसिंह हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलीवुडपटाचा रिमेक असून त्यात आमिरने मुख्य भूमिका साकारली आहे. इंग्रजी चित्रपटात ऑस्कर पुरस्कार विजेता टॉम हंक्सने हा रोल केला होता.





