Kuwait International Airport : कुवेतच्या विमानतळावर अडकलेले भारतीय मार्गस्थ

कुवेत सिटी : कुवेतच्या विमानतळावर सुमारे २० तास अडकून पडलेले काही भारतीय अखेर आज सकाळी मॅन्चेस्टरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. गल्फ एअर कंपनीच्या विमानातील हे प्रवासी कुवेतच्या विमानतळावर सुमारे २० तास अडकून पडले होते. हे विमान बहारीनवरून मॅन्चेस्टरला जाण्यासाठी दिनांक १ डिसेंबरला पहाटे २ वाजता निघाले होते.
मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते कुवेतकडे वळवण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच तांत्रिक बिघाड लक्षात आल्यामुळे पहाटे ४ वाजता विमान कुवेत विमानतळावर उतरवण्यात आले. अनेक तासांपासून कुवेत विमानतळावर अडकून पडल्याची तक्रार काही प्रवाशांनी केल्यावर कुवेतमधील भारतीय दुतावासाने गल्फ एअर कंपनीकडे याबाबत विचारणा केली.
दरम्यान दूतावासाचे पथक विमानतळावर दाखल झाले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांच्या मुक्कामाची आणि खाण्याची सोय करण्यात आली. विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर आज पहाटे साडे ४ वाजता या प्रवाशांना घेऊन विमान मॅन्चेस्टरकडे रवाना झाले, असे गल्फ एअर कंपनीने म्हटले आहे.





