BJP News : भाजपला आणखी एक धक्का; तरुण तडफदार माजी आमदाराचा पक्षाला रामराम
BJP News : उत्तर प्रदेशातील बिसौलीचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्टमधून त्यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. सपा प्रवेशाची चर्चा आहे.

BJP News : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्के बसत आहेत. गेल्या आठवड्यात आंवला येथील माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत पक्षाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कुशाग्र सागर समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
कुशाग्र सागर यांनी फेसबुक पोस्टमध्ये भाजपसोबतच्या ११ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. या काळात पक्षाला कुटुंब मानून काम केले. वैयक्तिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीतही पक्षासाठी पूर्ण क्षमतेने काम केले. मात्र, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा सन्मान आणि विश्वासाला महत्त्व आहे. ११ वर्षांच्या मेहनतीनंतरही अपेक्षित आपलेपणा मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच हा शेवट नसून आत्मसन्मानाची नवी सुरुवात असल्याचेही त्यांनी म्हटले.
कोण आहेत कुशाग्र सागर –
कुशाग्र सागर हे बिसौलीतील मोठ्या राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील योगेंद्र कुमार सागर हेही आमदार राहिले आहेत. कुशाग्र यांनी २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर १ लाख २८७ मते मिळवत १० हजार ६८८ मतांनी विजय मिळवला होता. मात्र, २०२२ मध्ये त्यांना आशुतोष मौर्य यांच्याकडून केवळ १ हजार ८३४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मौर्य यांना १ लाख १० हजार ५६९, तर कुशाग्र यांना १ लाख ८ हजार ७३५ मते मिळाली होती.
कुशाग्र सागर हे सध्याचे आमदार आशुतोष मौर्य यांना भाजपमध्ये मिळणाऱ्या महत्त्वामुळे नाराज असल्याची चर्चा होती. मौर्य हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगनंतर त्यांच्या भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा झाली. एप्रिल २०२४ मध्ये मौर्य यांच्या पत्नी सुषमा मौर्य आणि बहिणीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चेला सुरुवात झाली होती.
कुशाग्र सागर समाजवादी पक्षात गेल्यास बिसौली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





