प्रभात वृत्तसेवा पळसदेव/ यवत – पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावाच्या हद्दीतील ब्रिजच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत पळसदेव (ता. इंदापूर) येथील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी (दि. 02) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ गावच्या हद्दीतील ब्रिजवर ही घटना घडली आहे.खंडू नारायण बनसुडे (वय-35) व रूद्र खंडू बनसुडे (रा. पळसदेव ता. इंदापूर), असे अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ संतोष नारायण बनसुडे (वय 40, रा. पळसदेव) यांनी कंटेनर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दौंड पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावाच्या हद्दीतील ब्रिजवर रविवारी (दि.2) खंडू बनसुडे व रूद्र बनसुडे हे बापलेक दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. कुरकुंभ ब्रीजवर विरूध्द (चुकीच्या) दिशेने एक कंटेनरवरील भरधाव वेगाने येऊन दुचाकीला धडकला. वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून जबर धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना कोणतीही मदत न करता चालक घटनास्थळून पळून गेला. अपघातात खंडू व रूद्र बनसुडे यांच्या डोक्याला हाताला, पायाला, गंभीर दुखापत होवून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मोटरसायकलीचेही मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, याप्रकरणी संतोष बनसुडे यांनी कंटेनर चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार दौंड पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत.