‘एप्रिल, मे-जूनमध्ये शेतकऱ्यांकडे काम नसते तेंव्हाच गुन्हेगारी वाढते” ; पोलीस अधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

Kundan Krishnan । बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत राज्याचे एडीजी कुंदन कृष्णन यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहारमधील काही काळापासून वाढत्या गुन्हेगारीबाबत कुंदन कृष्णन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “एप्रिल, मे आणि जूनमध्ये बिहारमध्ये खुनाच्या घटना अधिक घडतात. वर्षानुवर्षे हे घडत आहे. पाऊस पडत नाही तोपर्यंत… हा क्रम सुरूच राहतो. कारण बहुतेक शेतकऱ्यांकडे कोणतेही काम नसते. पाऊस पडल्यानंतर शेतकरी समुदायातील लोक व्यस्त होतात. ” असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे.
एडीजी कृष्णन यांचे वादग्रस्त विधान
एडीजी कृष्णन यांनी आपल्या प्रतिक्रियेत बोलताना, “बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जूनमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होते, हे असे महिने आहेत जेव्हा कोरड्या हवामानामुळे शेतीची कामे ठप्प असतात. या काळात, शेतकरी समुदायातील बेरोजगार तरुण, विशेषतः ग्रामीण भागातील, अनेकदा पैशासाठी गुन्ह्यांकडे वळतात, ज्यात कंत्राटी हत्यांचा समावेश आहे.” असे वादग्रस्त विधान केले आहे.
तेजस्वी यादवांकडून एडीजींच्या विधानाचा निषेध
दरम्यन , कुंदन कृष्णन यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी याविषयी बोलताना,” हे एक कारण देत असून ते पोलिसांच्या मनोबलावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, “पोलिस अधिकाऱ्यांनी अशी विधाने करू नयेत. यामुळे पोलिसांचे मनोबल खचते. पोलिस असे गृहीत धरत आहेत की गुन्हे वाढले आहेत. बिहारमध्ये प्रत्येक ऋतूत गुन्हे घडतात. उन्हाळ्यात ते उष्णतेला दोष देतात, हिवाळ्यात ते थंडीला दोष देतात. ही अविश्वसनीय अक्षमता आहे. मुख्यमंत्री काहीही करत नाहीत.” असे म्हणत त्यांनी नितीशकुमार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
विजय सिन्हा यांचीही एडीजींच्या विधानावर टीका Kundan Krishnan ।
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनीही एडीजींच्या विधानावर टीका केली. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचे जोरदार समर्थन केले. सिन्हा म्हणाले, “शेतकरी अन्नदाता आहेत. ते स्वतःचे आणि इतरांचे पोट भरण्यासाठी कठोर परिश्रम करतात. शेतकरी गुन्हे करत नाहीत. जे इतरांवर अवलंबून असतात ते गुन्ह्यांबद्दल बोलतात. मी एडीजींचे विधान ऐकले नाही, परंतु जर त्यांनी असे म्हटले असेल तर ते योग्य नाही. शेतकऱ्यांचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.” असे म्हटले आहे.
रुग्णालयात कैद्याची हत्या Kundan Krishnan ।
गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. काल पाटण्यातील एका रुग्णालयात गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली. पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचारासाठी एका कैद्याला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रांनी सज्ज असलेल्या पाच गुंडांनी निर्भयपणे रुग्णालयात प्रवेश केला आणि उपचार घेत असलेल्या कैदी चंदन मिश्रावर गोळीबार केला.रुग्णालयात उपस्थित असलेले इतर रुग्ण आणि सेवक जीव वाचवण्यासाठी पळाले. उपचारादरम्यान चंदन मिश्राचा मृत्यू झाला.





