Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ ! आणखी 3 ठिकाणी एफआयआर दाखल

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंगात्मक गीत गायल्यानंतर अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात कामरा याला अटक करावी, अशी मागणी शिवसेना पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. यादरम्यान कुणाल कामरा याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केल्या प्रकरणात कामरा याच्याविरोधात महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.
हे नवीन गुन्हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी या तक्रारी पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची खार पोलीसांकडून आधीपासून चौकशी केली जात आहेत. खार पोलिसांनी कामरा याला चौकशीसाठी हजर राहाण्याकरिता दोन समन्स देखील बजावले आहेत. कामराने त्याला एक आठवड्याची मुदत दिली जावी अशी विनंती केली होती मात्र पोलिसांनी त्याची विनंती फेटाळून लावली होती.
शुक्रवारी कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने सात एप्रिल पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कामरा याच्याविरुद्ध पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. तीन नवीन एफआयआर देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी दाखल केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे मयूर बोरसे यांनी तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संजय भुजबळ आणि नाशिकच्या नांदगाव मनमाड येथे सुनील जाधव यांनी एफआयआर दाखल केला आहे.





