“कुणाल कामरा वाद: स्टँडअप कॉमेडीची १३० वर्षांची कहाणी, कशी झाली सुरुवात?”

मुंबई : एखाद्याला हसवणं ही सर्वात अवघड कला मानली जाते. आजच्या तणावग्रस्त वातावरणात तर ही कला आणखीच आव्हानात्मक झाली आहे. पण हाच तणाव कमी करण्याचं काम करते ती म्हणजे कॉमेडी! सिनेमातली कॉमेडी, नाटकातली हास्यकला किंवा आजकाल खूपच लोकप्रिय झालेली स्टँडअप कॉमेडी. पण ही स्टँडअप कॉमेडी नेमकी आहे तरी काय? आणि तिचा १३० वर्षांहून अधिक जुना इतिहास कसा आहे? चला, जाणून घेऊया!
स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय?
स्टँडअप कॉमेडी म्हणजे एक प्रेक्षक, एक स्टेज आणि त्यावर उभा असलेला कलाकार, जो आपल्या स्क्रिप्ट आणि खास शैलीने ठराविक वेळेत प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. पण आजकाल हसवणं हे वादाचं कारणही बनतंय. कोणत्या गोष्टीवर कोणाच्या भावना दुखावतील, कोणतं वक्तव्य कधी मोठा वाद निर्माण करेल, यामुळे स्टँडअप कॉमेडियन्ससमोरची आव्हानं वाढली आहेत.
कुणाल कामराचा वाद काय?
सध्या कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अलीकडेच त्याने महाराष्ट्रात एक शो केला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांवर टोमणे मारले. त्याची कॉमेडी प्रेक्षकांना हसवून गेली, पण शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आणि वाद वाढत गेला. कुणालच्या या वादाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक स्टँडअप कॉमेडियन्स आपल्या विनोदांमुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण आज आपण वादांवर नाही, तर स्टँडअप कॉमेडीच्या मूळ आणि इतिहासावर प्रकाश टाकणार आहोत.
स्टँडअप कॉमेडीचा १३० वर्षांचा इतिहास
‘Behind the Burnt Cork Mask’ या पुस्तकातून अमेरिकेतील सुरुवातीच्या संस्कृती आणि स्टँडअप कॉमेडीच्या इतिहासाची माहिती मिळते. ही कला १३० वर्षांहून जुनी आहे आणि तिची सुरुवात अमेरिकेत झाली. अमेरिकेच्या इतिहासात गोरे आणि काळे यांच्यातील संघर्ष प्रसिद्ध आहे. या संघर्षातूनच ‘मिन्स्ट्रेल शो’ नावाची वंशवादी कॉमेडी जन्माला आली. या शोमध्ये गाणी, नृत्य आणि नाटक असायचं, पण त्यात काळ्या लोकांची थट्टा करणं हा मुख्य भाग असायचा. गोरे कलाकार काळे कपडे घालून त्यांचा उपहास करायचे. १८३० मध्ये मिन्स्ट्रेल शो सुरू झाले आणि जवळपास ७० वर्षे ते चालले. १९०० नंतर हे स्वरूप हळूहळू बंद झालं आणि नव्या प्रकारची कॉमेडी उदयाला आली.
‘वॉडव्हिल’ काळ काय होता?
स्टँडअप कॉमेडीच्या इतिहासात ‘वॉडव्हिल’ हा काळ महत्त्वाचा आहे. ‘वॉडव्हिल’ हा फ्रेंच शब्द असून, याचा अर्थ असा थिएटर जिथे अनेक कला सादर केल्या जायच्या – ॲक्रोबॅटिक्स, जादू, कॉमेडी आणि शक्तिप्रदर्शन. आजची ‘स्लॅपस्टिक कॉमेडी’ याच काळातून जन्माला आली असं मानलं जातं. हा काळही १८०० च्या आसपासचा आहे. न्यूयॉर्कमधील आधुनिक थिएटरची पायाभरणी याच वॉडव्हिल काळात झाली. प्रेक्षकांचं लक्ष कसं ठेवायचं, सातत्याने हसवत कसं राहायचं, यावर भर दिला जायचा. हा काळ अमेरिका आणि कॅनडात ५० वर्षे चालला, पण १९३० नंतर त्याचा प्रभाव कमी झाला.
पहिला स्टँडअप कॉमेडियन कोण?
स्टँडअप कॉमेडीच्या इतिहासात अमेरिकन समालोचक विल रॉजर्स यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांनी वृत्तपत्रातील कॉलम्समधून लोकप्रियता मिळवली आणि तीन जागतिक दौरे केले. सामाजिक संदेशांना विनोदाची जोड देण्यात ते माहीर होते. पण १९३५ मध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
स्टँडअप कॉमेडीचे प्रकार
आज स्टँडअप कॉमेडी करिअरचा एक लोकप्रिय पर्याय बनली आहे. यात ‘क्लासिक कॉमेडी’ (कलाकाराला हव्या त्या विषयावर विनोद), ‘स्केचेस’ (रोजच्या घटनांवर आधारित स्क्रिप्ट), ‘रोस्टिंग’ (एखाद्याची थट्टा) आणि ‘इम्प्रूव्ह’ (प्रेक्षकांनी दिलेल्या विषयावर तात्काळ कॉमेडी) असे प्रकार आहेत. ‘इम्प्रूव्ह’ हा सर्वात अवघड प्रकार मानला जातो, ज्यात कपिल शर्मा सारखे कलाकार माहीर आहेत.
भारतात स्टँडअपचा उदय
भारतात स्टँडअप कॉमेडीची खरी सुरुवात २००७ मध्ये ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोमुळे झाली. याआधी कविसंमेलनातून आणि पंजाबमधील कॅसेट्समधून विनोद सादर होत होते. डिजिटल युगाने याला नवं वळण दिलं. कुणाल कामरा, झाकीर खान, गौरव गुप्ता, नेहा पाल्टा, भुवन बाम यांसारख्या कलाकारांनी यूट्यूब आणि वेब सिरीजमधून लोकप्रियता मिळवली.
लक्ष्मणरेखेचा प्रश्न
स्टँडअप कॉमेडी ही जुनी कला असली तरी आज ती वादग्रस्त ठरतेय. तिच्यात मर्यादा पाळायला हवी का? कुणाल कामरासारख्या कलाकारांचं भवितव्य काय असेल? याची उत्तरं भविष्यातच मिळतील!


