Kumar Sanu: कुमार सानू विवादात; माजी पत्नी रीटाचे दावे चर्चेत, बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळाला आश्रय

Kumar Sanu: बॉलीवूड गायक कुमार सानू यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांची माजी पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटाला जवळपास तीन दशके लोटल्यानंतर त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कुमार सानूंवर गंभीर आरोप केले आहेत.
कुमार सानू उर्फ केदारनाथ भट्टाचार्य यांनी १९८६ मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला तीन मुलं असून १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नानंतर काही वर्षांनी सानू यांनी छळ सुरु केल्याचा दावा रीटा यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “तिसऱ्या गरोदरपणात मला प्रचंड त्रास दिला. घराबाहेर जाऊ दिलं नाही, खाण्यापिण्याचे हाल केले. घटस्फोटासाठी कायदेशीर लढाईत मला खेचलं. तेव्हा त्यांचे अन्य संबंध होते, ज्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं.”
रीटा पुढे सांगतात की, “मी खूप लहान होते. मित्रमैत्रिणी बनवण्याची परवानगी नव्हती. सगळं सहन करावं लागलं. घटस्फोटानंतर मुलांसह राहण्यासाठी घराची गरज होती. मी त्यांच्या बंगल्याचा हिस्सा मागितला पण न्याय मिळत नव्हता.”
या कठीण प्रसंगी त्यांनी एका मुलाखतीतून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची दखल स्वतः बाळासाहेबांनी घेतली. राज ठाकरे यांनी त्यांना संपर्क साधला आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घडवून आणली.
रीटा यांच्या मते, “मी सगळी परिस्थिती बाळासाहेबांना सांगितली. त्यांनी दोघांना समोर बसवून चर्चा केली. त्यानंतर मला ‘आशिकी बंगला’मधील हिस्सा देण्यात आला. ५० टक्के भाग माझ्या नावावर होता. ही मोठी मदत होती, जी मी कधीच विसरू शकत नाही.”
रीटा भट्टाचार्य यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा कुमार सानूंचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे.



