Dhananjay Mahadik : “कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला…” ; लेकावर मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया समोर
Dhananjay Mahadik : कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली.

Dhananjay Mahadik : भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे प्रेदशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली.
यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. या नवीन कार्यकरणीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यानंतर त्यांचे वडिल खासदार धनंजय महाडिक यांनी “कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही. त्या वाक्याची आज पहाट झाली, ” अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. वरिष्ठ स्तरावर काही निर्णय झाला आणि कृष्णराज यांनी निवडणूक लढण्यापासून माघार घेतली. पक्षाचा आदेश महत्वाचा असे म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांनी दाखवलेल्या संयमाचे मोठं गिफ्ट त्यांना दिले आहे. त्यांची भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निर्णयानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता राज्यभरातील तरुणांना पक्षामध्ये आणण्यासाठी कृष्णराज काम करेल, असे ते म्हणाले आहेत. भाजप पक्ष हा कधीही कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही. अशी मोठी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
कोण आहेत कृष्णराज महाडिक?
भाजप पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे त्यांच्या यू ट्यूब व्लॅागिंगमुळे लोकप्रिय आहेत. त्यांच्या स्वतःच्या नावाने सुरू असलेल्या यू ट्यूब चॅनेलचे ७ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्यांची वेगळी ओळख सांगायची झाल्यास कृष्णराज हे आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. २०१२ आणि २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.





