Satara news : कृष्णा, कोयना गढूळ; दुषित पाण्याचा धोका ! आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

संजय पाटील / कराड : कृष्णेसह कोयना नदीत पावसामुळे गढूळ पाणी आले आहे. परिणामी, दुषित पाणी पुरवठा होवून साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणी योजना नदीवर आहेत. तसेच शुद्धीकरण यंत्रणाही सक्षम नसल्याने दुषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये दूषित पाणी मिसळून साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण करून प्रक्रिया करणे आकश्यक असते. कराड तालुक्यातील अनेक गावांना कोयना तसेच उत्तरेतील गावांना कृष्णा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. काही गावांमध्ये पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून त्याचा पुरवठा केला जातो. मात्र, काही गावांमध्ये नदीतून पाणी उचलून ते नळपाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून थेट ग्रामस्थांना पुरविण्यात येते.
पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे नदीतील पाणी जसेच्या तसे पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, नद्यांचे पाणी गढूळ व दुषित झाले असून ते पाणी पिल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किती गावांना नदीचे पाणी?
गावे : नदी
42 : कृष्णा
13 : कोयना
6 : तारळी
5 : दक्षिण मांड
5 : वांग .
71 : एकुण
दक्षिणेत 13, उत्तरेत 48 गावे नदीकाठी
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नोंदीनुसार कजहाड दक्षिणेतील तेरा तर उत्तरेतील 48 गावे नदीकाठी आहेत. तारळी हे कृष्णेची तर वांग आणि दक्षिण मांड या कोयनेच्या उपनद्या आहेत.
दूषित पाणी पिल्यास…
दुषित पाण्यामुळे काविळसह अमिबियासिसचा धोका निर्माण होतो. हिपॅटायटीस ए आणि ई असे जीवघेणे आजारही होऊ शकतात. मळमळ, अतिसार, अनपेक्षित वजन कमी होणे, पोटदुखी, ताप अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
पावसामुळे नद्यांचे पाणी गढूळ झाले आहे. तसेच इतरही जलस्त्रोत दुषित झाले असण्याची शक्यता आहे. गावोगावच्या आरोग्य सेवकांना नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी निर्जंतुक करण्याच्यादृष्टीने सुचित केले आहे. ग्रामसेवकांनाही त्याबाबत सुचना केल्या आहेत. ग्रामस्थांनी पाणी उकळून व थंड करुन प्यावे.
– नरेंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी, कराड





