कराड : सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, कोणत्याही कारखान्याने उस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आपण यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडावी. तसेच चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला एकरकमी चार हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आ. डॉ. अतुल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, सुनील कोळी, उत्तम खबाले, बाबासो मोहिते, सागर कांबळे, शंभू पाटील उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, साखर निर्यातबंदी उठवावी. साखरेचे भाव प्रतिकिलो चाळीस रुपये करावा. इथेनॉलसाठी उसाचा रस वापरण्यास परवानगी द्यावी, उसाचा एफआरपी बेस 8.30 टक्के पूर्वीप्रमाणे करण्यात यावा. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी कोणत्याही प्रकारचे तीव्र आंदोलन झाले नसल्याने ऊसाला वाढीव दर मिळालेल्या नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात न बसता आपल्या कामाचे दाम मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा. सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडलेले असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. तसेच लोकांना केंद्र सरकारचे सहा हजार, लाडक्या बहिणींचे दीड हजार, अर्ध्या तिकिटात एसटी, मोफत रेशन मिळत असल्याने यातचजनता गडबडून गेली आहे. शेतकरी हक्काचे, कष्टाचे, घामाचे दाम मागायचे विसरला आहे. शेतकऱ्याच्या ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, दुधाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्याव उतरावे. लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी बळीराजा शेतकरी संघटना कायम राहील, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.