Krishna Andekar: कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उधळला
Krishna Andekar:

पोलीस वाहनाचा पाठलाग करून हल्ल्याची तयारी; पाच जणांवर गुन्हा
Krishna Andekar: नाना पेठेतील आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वर्चस्वाच्या संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, न्यायालयीन कामकाजासाठी आणलेल्या कृष्णा आंदेकर व त्याच्या साथीदारांवर पोलीस वाहनावर हल्ला करून खून करण्याचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत पाच जणांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सूरज अशोक ठोंबरे (२४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (२४), वेदांत रोहित सावंत ( २१), धीरज लखारा (दोघे रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (२१, रा. गुजरवाडी, कात्रज), तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट- २ मधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी फिर्याद दिली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक असलेले कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांना न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आणले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा नंदुरबार कारागृहात पोलीस बंदोबस्तात नेताना आरोपींनी शिवाजीनगरपासून चाकणजवळील कुरोळीपर्यंत पोलीस वाहनाचा पाठलाग करून संपूर्ण मार्गाची रेकी केली. पोलीस ताफ्याची हालचाल, सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताची माहिती मोबाइलद्वारे मुख्य सूत्रधार सूरज ठोंबरे याला पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडे अग्निशस्त्रे उपलब्ध होती. पोलीस वाहन अडवून कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. आरोपींना हल्ल्यासाठी पिस्तूल पुरविल्याचेही समोर आले आहे. हा कट आयुष कोमकर व गणेश काळे यांच्या हत्येचा, तसेच अक्षय म्हस्केवरील प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रचला होता.
आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते सध्या नंदुरबार कारागृहात आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.




