Krishav Shah : मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!
Krishav Shah : राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई

Krishav Shah : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या क्रिशव कवित शाह याने दमदार कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान मिळवत त्याने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत क्रिशवने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदके मिळवली.
क्वालालंपूर येथील सिटिटेल मिड व्हॅली हॉटेलमध्ये ४ ते १२ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत भारतासह १३ देशांतील २९३ युवा बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला. मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केनिया, बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा, नामिबिया, ब्रुनेई आणि स्कॉटलंड या देशांतील खेळाडूंचाही त्यात समावेश होता.
पंधरा वर्षांखालील गटात क्रिशवने एकाग्रता, अचूक निर्णय आणि आत्मविश्वासाच्या जोरावर चांगली कामगिरी केली. विविध देशांतील खेळाडूंविरुद्ध खेळताना त्याने संयम राखत आपले कौशल्य दाखवले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीमुळे त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठीही महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे.
क्रिशवच्या या यशाबद्दल कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत त्याचे अभिनंदन केले. दोन सुवर्णांसह चार पदके मिळवत त्याने कुटुंबीयांसह भारताचेही नाव उंचावले आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशीच कामगिरी करून देशाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा कुटुंबीयांनी दिल्या आहेत.





