KP Sharma Oli : नेपाळ सरकारकडून आपल्या अटकेचा प्रयत्न; माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा आरोप

काठमांडू : नेपाळमधील हंगामी सरकार कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्याला अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी केला आहे. नेपाळमध्ये पुढील वर्षी ५ मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याबाबत हंगामी सरकारला गांभीर्य नाही, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर ओली यांनी प्रथमच माध्यमांमधील संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांशी वार्तालाप केला.
संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यात आले आहे. मात्र हे सभागृह पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपला कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ -यूएमएल पक्ष प्रयत्नशील असेल, असेही ओली यांनी सांगितले. आपल्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अटक करण्याचे प्रयत्न हंगामी सरकारकडून केले जात आहेत, असे ते म्हणाले.
जेन-झी आंदोलकांकडून आपल्याला लष्कराने वाचवले. पण काही दिवस आपला मोबाईल काही दिवसांसाठी ताब्यात ठेवला गेला होता. त्यानंतरही सरकारने आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. आपण पंतप्रधान असताना देशातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगली होती. आता माध्यमांवर नियंत्रण आणले गेले आहे. आता माध्यमांनी स्वतःच स्वतःवर सेन्सॉरशीप लावून घेतली आहे, असा दावाही त्यांनी केला.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या गटाने केलेल्या उग्र आंदोलनानंतर ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील यांना हंगामी पंतप्रधान नियुक्त केले गेले. नव्या सरकारने तात्काळ संसदेचे निष्ठ सभागृह विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.




