पुणे | दांडिया कार्यक्रमात कोयता गँगची दहशत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दांडिया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कात्रज भागातील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी सराईतासह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जुन दिलीप मोरे (१९, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अर्जु आणि त्याचा मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात मंगळवारी रात्री दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असताना सराईत अमित चोरगे आणि साथीदार तेथे आले.
संतोषनगर परिसरात चोरगेची काही जणांशी भांडणे झाली होती. त्या वादातून चोरगे आणि साथीदारांनी दांडिया कार्यक्रमात कोयते उगारून दहशत माजविली.
टोळक्याने कोयते उगारल्याने कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक पळाले. त्या वेळी अर्जुन मामाच्या मुलासह पळत असताना खाली पडला.
त्या वेळी चोरगे आणि साथीदारांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, चोरगे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दहशत माजवून पसार झाले. पसार झालेल्या चोरगे आणि साथीदारांचा शोध सुरू असून, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेटे तपास करत आहेत.
आणखी एकावर कोयत्याने वार
दांडिया खेळताना झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
आनंद देवेंद्र मांगले (४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत मांगले यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्व रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री शिवमित्र मंडळाकडून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वादातून राजवर्धन नुगला यास आरोपी मारुती गवंडी, ऋषीकेश गवंडी यांनी मारहाण केली. आनंद मांगले यांनी भांडणात मध्यस्थी केली.
या कारणावरून आरोपींनी मांगले यांच्यावर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे तपास करत आहेत.




