Koyta Gang Crime: फ्लाईंग जिप्सी कॅफेत पहाटे ‘कोयता गँग’चा धुमाकूळ
Koyta Gang Crime: रिल्सवरील लाईक-कमेंटवरून एकावर कोयत्याने वार

पुणे : डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रिल्सवरील लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट कोयत्याने हल्ला करण्यात झाले.
आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कॅफेमध्ये धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली असून, या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
रिल्सवरील लाईक आणि कमेंट करण्याच्या कारणावरून टोळक्यातील काही जणांचा एका तरुणाशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे कॅफेमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, याच ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये यापूर्वी तोडफोड आणि गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना २९ जून २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. मात्र, घटनेची सत्यता तपासल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.
निलंबनाच्या कारवाईनंतर पुन्हा त्याच कॅफेमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान कोयत्याने हल्ला झाल्याने डेक्कन परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पहाटे चार वाजेपर्यंत कॅफे सुरू ठेवण्यास परवानगी कशी मिळते, तसेच एवढ्या मोठ्या टोळक्याकडून कोयता आणला जात असताना सुरक्षा यंत्रणा काय करत होती, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून संबंधित तरुणांचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जात आहे.




