Koyta Attack – किरकोळ कारणावरून तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साष्टे-कोलवडी (ता. हवेली) रस्त्यावरील एका हॉटेलसमोर सोमवारी (दि. 23) सायंकाळी घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश प्रकाश गायकवाड व सुरज रवींद्र गायकवाड (दोघे रा. कोलवडी माळवाडी, ता. हवेली) अशी आरोपींची नावे असून, याबाबत उमेश कैलास लोणकर (वय 38, रा. लोणकरवस्ती, कोलवडी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी उमेश लोणकर हे सोमवारी दुपारी मित्र ओंकार हरगुडे यांच्यासोबत साष्टे-कोलवडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास जेवण करून ते घरी निघाले असता प्रथमेश गायकवाड याने त्यांना थांबवले. तू माझ्याकडे रागाने का पाहतोस? अशी विचारणा करत त्याने वाद सुरू केला. लोणकर यांनी वाद टाळण्याचा प्रयत्न करत उद्या बोलू असे सांगून निघण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. वाद वाढल्यानंतर तुझ्यापुढे शस्त्रांचे पोते ओतून तुझ्यावर फायरिंग करतो, अशी धमकी देत आरोपींनी कमरेला लपवून ठेवलेले लोखंडी कोयते बाहेर काढले आणि तुझा आताच कार्यक्रम करतो असे म्हणत अंगावर धावून आले. यावेळी उमेश लोणकर यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. या घटनेनंतर त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.