koyna dam water release : कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण पूर्णपणे कमी झाल्याने धरणातील नवीन पाण्याचा ओघ लक्षणीय घटला आहे. या पार्श्वभूमीवर धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवरून दोन फुटांवर खाली आणून १८,२६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
सध्या धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट कार्यरत असून त्याद्वारे २,१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकूण २०,३६६ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता धरणाची पाणीपातळी २१६२ फूट ०७ इंच (६५९.१५५ मीटर) इतकी नोंदली गेली. धरणात १०४.०६ टीएमसी (९८.८७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसाभरात धरणात केवळ १७,७५२ क्युसेक (१.५३ टीएमसी) इतकाच नवीन ओघ आला. पावसाचा जोर मंदावल्यानंतर धरणातील जलसाठा सध्या नियंत्रित स्थितीत आहे.
कोयना प्रकल्प क्षेत्रात रविवारी फारच अल्प पावसाची नोंद झाली. कोयना येथे ३ मिमी, नवजा येथे ८ मिमी तर महाबळेश्वर येथे १७ मिमी पाऊस झाला. एकूण हंगामातील पर्जन्यमान कोयना येथे ४६७० मिमी, नवजा येथे ५८९६ मिमी तर महाबळेश्वर येथे ५६०७ मिमी इतके झाले आहे.धरणाच्या विसर्गामध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे व अधिकृत सूचना पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

