Koyna Dam : कोयना धरणातून पाण्याचा 11,680 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
पाणलोट क्षेत्रातील संततधार मुसळधार पावसामुळे धरणातील (Koyna Dam) पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात ११,६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Koyna Dam : पाणलोट क्षेत्रातील संततधार मुसळधार पावसामुळे धरणातील (Koyna Dam) पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात ११,६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाची संततधार कायम असून, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात सुमारे २५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, त्यामुळे धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सुरुवातीला धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटावर उघडण्यात आले होते. तसेच पायथा विद्युतगृह सुरू करून त्याद्वारे ६,१२९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि जलसाठ्यात वाढ होत असल्याने विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सध्या १ फुटावर उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी १ फुटाने वाढवून २ फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे धरणातून (Koyna Dam) कोयना नदीपात्रात एकूण सुमारे ११,६८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गात पुढील काळात वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी नदीपात्रात जाणे, पोहणे, मासेमारी तसेच जनावरे पाण्यात नेणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





